Maharashtra Election News : महानगरपालिका रणधुमाळीत हिंदुत्ववादी नेत्यांची जोरदार मागणी.
मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू असून, प्रचारासाठी हिंदुत्ववादी नेत्यांच्या सभांना मोठी मागणी असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.महायुतीकडून प्रचाराची रणनीती अधिक आक्रमक करण्यात आली असून, हिंदुत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवण्यावर भर दिला जात आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण, तसेच राज्यातील मंत्री नितेश राणे आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारसभांसाठी कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.या नेत्यांच्या सभा मिळवण्यासाठी विविध शहरांतील कार्यकर्ते जोरदार फिल्डिंग लावत असल्याची माहिती आहे. ठाकरे बंधूंकडून मांडल्या जाणाऱ्या मराठी विरुद्ध अमराठी नॅरेटिव्हला छेद देण्यासाठी महायुतीकडून हिंदुत्ववादी नॅरेटिव्हचा प्रभावी वापर केला जात असल्याचे बोलले जात आहे.
मुंबईसह वसई-विरार, मिरा-भाईंदर, भिवंडी, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, अहिल्यानगर आणि सोलापूर या सर्व महानगरपालिकांमध्ये प्रचाराला वेग आला आहे.विशेषतः मंत्री नितेश राणे यांच्या प्रचारसभांना उमेदवारांकडून मोठी पसंती दिली जात आहे.दरम्यान, काँग्रेसने सोलापूर महानगरपालिकेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून, समाजवादी पक्षाने मुंबईसाठी पहिली यादी जाहीर केली आहे.एकूणच, महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून प्रचारात हिंदुत्वाचा मुद्दा निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
What's Your Reaction?