मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे.स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करणाऱ्या काँग्रेसमधील माजी नगरसेवक चंगेज मुलतानी यांनी पक्षाला रामराम ठोकत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT) मध्ये प्रवेश केला आहे.
जोगेश्वरी पश्चिम विभागातून पूर्वी काँग्रेसचे नगरसेवक असलेले चंगेज मुलतानी यांनी मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेत अधिकृत प्रवेश केला.या प्रवेशामुळे मुंबईतील काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसकडून उमेदवारीबाबत सातत्याने निर्णय रखडवण्यात येत असल्याने मुलतानी नाराज होते.पक्षात योग्य सन्मान आणि संधी न मिळाल्यामुळेच त्यांनी उद्धव सेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.
या घडामोडीमुळे मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या स्वतंत्र लढतीसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.एकीकडे शिवसेना (UBT) आणि मनसे यांची युती मजबूत होत असताना, दुसरीकडे काँग्रेसमधून नेते बाहेर पडत असल्याचे चित्र दिसत आहे.राजकीय विश्लेषकांच्या मते, चंगेज मुलतानी यांच्या प्रवेशामुळे उद्धव ठाकरे गटाची ताकद वाढणार असून, काँग्रेससाठी ही बाब चिंतेची ठरणार आहे.BMC Election 2026 जसजशी जवळ येत आहे, तसतशा अशा राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.